विजयवाडा - आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील जगगय्यापेटा येथे एका महिलेवर १५ दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र बुधवारी ही महिला सुखरूपपणे घरी आली. वृद्ध महिला सुखरूपपणे घरी आल्याचे पाहून गावातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ( The family cremated the dead body, the villagers were scared when the woman came back alive)मिळालेल्या माहितीनुसार जगगय्यापेटा येथे राहणाऱ्या मुत्याला गिरिजम्मा नावाची महिला २० दिवसांपूर्वी आजारी पडली होती. तिला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कुटुंबीयांनी या महिलेला विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या जावयाने सांगितले की, माझ्या सासऱ्यांनी फोन करून गिरिजाम्मा यांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले. मात्र पुन्हा एका तासानंतर फोन करून त्यांची तब्येत अधिकच बिघडली असल्याचे सांगितले. त्यानंतर १२च्या सुमारास गिराजाम्मा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाने माझ्या सासऱ्यांनी मुत्याला गिरिजाम्मा यांच्या नावाचे मृत्यू प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून स्मशानात नेऊन अंत्यसंस्कारही करण्यात आले. या घटनेनंतर सुमारे आठवडाभरानंतर २३ मे रोजी गिरिजाम्मा यांच्या मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. पण काही दिवसांनंतर बुधवारी गिरिजाम्मा ह्या या एका ऑटोरिक्षामधून येऊन घरासमोर उतरल्या. गिरिजाम्मा यांना जिवंत पाहून गावकरी घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. काही ग्रामस्तांनी त्या भूत असल्याचा समज करून घेतला. गिरिजाम्मा यांच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यावर गिरिजाम्मा यांनी त्या रुग्णालयातून बऱ्या होऊन परत आल्याचे सांगितले. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर गिरिजाम्मा यांना १२ मे रोजी विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे पती त्यांना रुग्णालयात दाखल करून गावी परतले. १५ मे रोजी ते रुग्णालयात गिरिजाम्मा यांच्या बेडजवळ गेले असता तिथे त्या नव्हत्या. त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. मात्र तिच्या पतीने डॉक्टरांना विचारले असता त्यांनी गिरिजाम्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच शवागारात जाऊन मृतदेह शोधण्यास सांगितले. तिथे ठेवलेला एक मृतदेह हुबेहूब गिरिजाम्मा यांच्यासारखाच होता. तोच कुटुंबीयांना सोपवण्यात आला. त्या मृतदेहावर त्यांनी अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या प्रकरणात डॉक्टरांचा बेफिकीरपणा दिसून आला आहे.
Coronavirus: मृत समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले, ती महिला जिवंत परत येताच गावकरी घाबरले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 8:18 AM