नवी दिल्ली - संपूर्ण जगातच कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतालाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका बसला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर आता कोरोनाच्या डेल्टा+ व्हेरिएंटची चर्चा सुरू आहे. यातच देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 22 रुग्ण समोर आले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना पत्रही लिहिले आहे. सध्या डेल्टा व्हेरिएंट जगातील 80 देशांत पसरला आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंट नऊ देशांत आढळून आला आहे. यात भारतासह अमेरिका, इंग्लंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, चीन, नेपाळ, रशिया आणि जपानचा समावेश आहे. (Coronavirus Fear of Delta plus variant in 9 countries, 22 patients found in India)
यासंदर्भात बोलताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे 22 रुग्ण आढळे असून, यातील 16 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळून आले आहेत. तर उरलेले सहा रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशात सापडले आहेत.
Corona Vaccine: कोरोना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लस किती प्रभावी? जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा खुलासा
देशात लसीकरणाचा नवा विक्रम -देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. यातच सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्याची घोषणा केली होती. आता कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणामही समोर येऊ लागले आहेत. देशात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 21 जूनला 88 लाखहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत लशीचे 29 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागांत 63.68 टक्के लसीकरण -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ज्या लोकांना लस टोचण्यात आली आहे, त्यांत 53 टक्के पुरुष आणि 46 टक्के महिला आहेत. कोविन अॅपमध्ये ट्रान्सजेंडरचा पर्यायही देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 63.68 टक्के लसीकरण ग्रामीण भागांत तर 36.32 टक्के लसीकरण शहरी भागात करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेदरम्यान झालेल्या लसीकरणानुसार राज्यांचा क्रमही सांगितला आहे. यात, मध्य प्रदेश 17 लाखहून अधिक डोस सह सर्वात वर आहे. यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गुजरात आणि राजस्थानचाक्रमांक लागतो.
डेल्टा प्लस विषाणू धोकादायक; महाराष्ट्रासह अन्य राज्यांत रुग्ण, ३५००० नमुन्यांची होणार तपासणी
देशाचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर -मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, की देशाचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर पोहोचला आहे. व्हीके पॉल यांनी सांगितले, की ग्रामीण भागांत लसीकरणाचा वेग चांगला आहे. ते म्हणाले, कोरोना सातत्याने रूप बदलत आहे. त्यामुळे याची नवीन लाट आली आणि आपण लस घेतलेली नसेल, तर याच्या विळख्यात सापडू.