नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ४४ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले तर ५५५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून त्यातील निम्मे रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. आता ईशान्येकडील पाच राज्यांतही कोरोना संसर्ग वाढत आहे. भारतात तिसरी लाट अद्याप आलेली नाही, मात्र ती केरळमधून येईल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४ लाख २३ हजार २१७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. ३ कोटी १५ लाख ७२ हजार ४४४ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ७ लाख ४३ हजार ९७२ जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्यांचा आकडा ४ लाख ५ हजार १५५ झाला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३४ टक्के आहे.
इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आजवर ४६ कोटी ४६ लाख ५० हजार ७२३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. गेल्या चोवीस तासांत सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये सुमारे पन्नास टक्के रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या पाच राज्यांतून सर्वाधिक कोरोना रुग्णांची दररोज नोंद होत आहे. कोरोना लसीचे आजवर ४५ कोटी ६० लाख ३३ हजार ७५४ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.
कोरोना साथीला आवर घालण्यासाठी केरळने केलेले प्रयत्न जगभरात नावाजले गेले होते. पण आता त्याच केरळमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र तेथील मृत्युदर कमी आहे. गेल्या चार आठवड्यांपासून देशातील २२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यात केरळमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट अद्याप आली नसली तरी तिची सुरुवात केरळमधून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या राज्याचा एकूण संसर्गदर १२.९३ टक्के असून दर आठवड्याचे प्रमाण ११.९ टक्के आहे. देशात केरळमध्ये अँटिबॉडीज तसेच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. चौथ्या सिरो सर्वेक्षणात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
ईशान्य भारतातही बिकट स्थिती ईशान्य भारतातील १३ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये आसाम, मेघालय, मणिपूर. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या ५ राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. मेघालयमधील पश्चिम गारो हिल्स प्रदेशात कोरोना रुग्णांची आकडेवारी ११० टक्क्यांनी वाढली आहे. अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम सियांगमध्ये व मणिपूरमधील नोने भागात हे प्रमाण अनुक्रमे ३०० टक्के व २६६ टक्के आहे.