जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा कहर भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच, आता देशात कोरोना व्हायरससंदर्भात भीती निर्माण झाली आहे. त्यातूनच एका महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
अरुणाचल प्रदेश येथे महिला अधिकाऱ्याने शुक्रवारी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण सहन न झाल्याने या महिला अधिकारी त्रस्त होत्या, तसेच कोरोना-कोविड १९ रोगाची भीतीही होती. त्यामुळे या महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलंय. याप्रकरणी पोलीस अधिकारी तुम्मे एमो यांनी म्हटलं की, पापुम पारे येथे आपत्ती निवारण अधिकारी शेरिंग युंगजोम (३८) यांनी जिल्हा उपायुक्त यांना उद्देशून आपले राजीनामा पत्र लिहून बाथरुममध्ये स्वत:ला फाशी लावून घेतली. त्यांच्या रुममधील एका टेबलवर हे पत्र मिळाल्याचे एसपी तुम्मे यांनी सांगितलं.
संबंधित अधिकारी महिलेल्या कुटुंबीयांनी मानसिक आणि शारिरीत त्रास सहन न झाल्याने आणि कोरोनाग्रस्त असल्याची भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. दरम्यानन, देशातील इतर राज्यांतूनही अशी प्रकरणे समोर येत आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने काही जणांकडून आत्महत्यासारखे पाऊल उचलण्याचे प्रयत्न होत आहेत. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या सहानपूर येथील एका व्यक्तीने कोरोना संक्रमणाच्या भीतीने आत्महत्या केली.