नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे चिंतीत असलेल्या जगाला ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरील लस यशस्वी ठरल्याचे समोर येताच मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेल्या या लसीची तिसऱ्या आणिन शेवटच्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी भारतातील पाच ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. डीबीटीचे सचिव रेणू स्वरूप यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे.
रेणू स्वरूप यांनी याबाबत सांगितले की, मानवी चाचणी ही एक आवश्यक बाब आहे. कारण भारतीयांना लस देण्यापूर्वी त्याबाबतची आकडेवारी माहिती असली पाहिजे. दरम्यान, ऑक्सफर्ड आणि त्याचे भागीदार असलेल्या एस्ट्राजेनेका यांनी लस यशस्वी होत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर त्याच्या उत्पादनासाठी सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाशी करार केला आहे.
स्वरूप म्हणाले की, डीबीटी भारतातील प्रत्येक कोविड-१९ वरील लसीच्या संशोधनात भागिदार आहे. दरम्यान, आता डीबीटी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ठिकाणांची तयारी करत आहे. आम्ही याबाबतचे काम आधीच सुरू केले होते. आता आम्ही वैद्यकीय चाचणीसाठी पाच स्थळांचा उपयोग करत आहोत.
डीबीटी प्रत्येक निर्मात्यासोबत काम करत आहेआमि सीरम संस्थेची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी महत्त्वपूर्ण आहे कारण या चाचणीत ही लस यशस्वी झाली आणि भारताला मिळाली. तर आमच्याकडे देशांतर्गत आकडेवारी उपलब्ध असली पाहिजे. त्यासाठी आम्ही तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण प्रस्तावित केले असून, या चाचणी साठी पाच ठिकाणांची निश्चिती केली आहे.
दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोरोनाविरोधातील लस सुरक्षित दिसत असून, परीक्षणामध्ये त्याचे प्रभावी परिणाम दिसून आले आहेत, असा दावा संशोधकांनी केला होता.