अहमदाबाद : गुजरातच्या भावनगरमध्ये कोरोना केंद्रात बुधवारी पहाटे आग भडकली. एका हॉटेलला कोरोना केंद्र करण्यात आले असून, येथे घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.अधिकाऱ्यांनी सांगितले की, किरकोळ आग लागल्यानंतर धूर निघाल्यामुळे कोरोना व्हायरसच्या एकूण ६१ रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. आग लागली त्यावेळी तेथे ६८ रुग्ण होते. उर्वरित सात रुग्णांनाही नंतर हलविण्यात आले. राज्याच्या राजधानीपासून १७० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलचे खाजगी रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. येथे लागलेली आग किरकोळ होती व ती लगेच नियंत्रणात आणण्यात आली.अग्निशमन दलाने सांगितले की, जनरेशन एक्स हॉटेल या कोरोना केंद्राच्या तिसऱ्या मजल्यावर धूर निघाला. याच मजल्यावर रुग्णांना ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर काही वेळाने टीव्हीमधून ठिणग्या उडाल्या व आग लागली. आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आले; परंतु त्या मजल्यावर धुरामुळे रुग्णांना ठेवणे अशक्य झाले होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ६१ रुग्णांना अग्निशमन दलाच्या मदतीने अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. भावनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना केंद्रातील सर्व ६८ रुग्ण सुरक्षित आहेत. १ मे रोजी गुजरातच्या भडोचमधील चार मजली रुग्णालयात आग लागून कोरोनाचे १६ रुग्ण व २ परिचारिकांचा मृत्यू झाला होता.
CoronaVirus : कोरोना केंद्रात आग, ६१ रुग्णांना हलविले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 6:14 AM