लखनऊ – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे आरोग्य व्यवस्थेचेही धिंडवडे निघताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची लागण असलेल्या गंभीर महिला रुग्णाला बेडदेखील उपलब्ध झाला नाही. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चक्करा मारतानाच या महिलेने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर तिच्या मृतदेहाला स्मशानभुमीत घेऊन जाण्यासाठीही नातेवाईकांना ताटकळत राहावं लागलं.
नातेवाईकांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना दोनदा विनवणी केली, त्यानंतर त्यांच्या आदेशानंतर तब्बल १७ तासांनी मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था झाली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लालकुआ येथील ५७ वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षण दिसत असल्याने १४ जुलै रोजी तपासणी केली. १६ जुलै संध्याकाळी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तिला लोकबंधू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी या महिलेला हायर स्पेशाएलिस्ट हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले. पहिले पीजीआय पाठवण्याचं सांगण्यात आलं त्यानंतर तिथे बेड उपलब्ध न झाल्याने केजीएमयू पाठवण्यात आलं.
केजीएमयूला घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी रुग्णाला बेड उपलब्ध झाला नाही, तेथील आरोग्य विभागाने रुग्णाला एरा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं, शुक्रवारी रात्री ८ वाजता रुग्णवाहिकेतून महिला रुग्णाला एरा मेडिकल कॉलेजला पाठवलं. पण त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचं सांगितलं. कॉलेज टीमच्या हॉल्डिंग एरियामधून रुग्णवाहिका परत पाठवण्यात आली. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी सीएमओ कंट्रोल रुमशी संपर्क साधला. लवकरच शववाहिका पाठवली जाईल असं आश्वासन मिळालं.
रात्री १२ पर्यंत शववाहिका येईल अशा सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या. तरीही शववाहिका पोहचली नाही. वारंवार आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर अखेर शनिवारी दुपारी शववाहिका उपलब्ध झाली. त्यानंतर संध्याकाळी ४ च्या सुमारास कोविड १९ मार्गदर्शक सूचनेनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला, त्याला आरोग्य विभाग जबाबदार आहे असा आरोप महिला रुग्णाच्या मुलाने केला आहे.
याबाबत सीएमओ डॉ. नरेंद्र अग्रवाल म्हणाले की, आमच्याकडे तीन शव वाहन आहेत. जी शववाहिका उपलब्ध असेल ती तात्काळ पाठवण्यात येते. काही खासगी वाहनंही घेतली आहे, मात्र या प्रकरणात कोणी दिरंगाई केली याचा तपास करुन योग्य ती कारवाई केली जाईल.