- हरीश गुप्तानवी दिल्ली : भारत फोर्ज कंपनीच्या सहकार्याने बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांची प्रक्रिया स्वातंत्र्य दिनाच्या आधी संपविण्याचे लक्ष्य इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल या संस्थेने ठेवले असले तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला नसल्याचे एम्सने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लस विकसित केल्याची घोषणा स्वातंत्र्य दिनी होण्याची शक्यता कमी आहे.या लसीच्या एम्स व अन्य ११ संस्थांमध्ये सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. दुसरा व तिसरा टप्पाही बाकी आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत तीनही टप्पे पूर्ण होणे शक्य नाही. त्याशिवाय झायडस कॅडिला कंपनी बनवत असलेल्या झायकोव्ह-डी लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा पार पाडण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठ व सिरम इन्स्टिट्यूट संयुक्तपणे बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्याही सुरू आहेत. मात्र वर्षाअखेरपर्यंत लस विकसित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळली आहे.सुरक्षेच्या नियमांचे पालनकोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केली होती. त्यामुळे या लसीची घोषणा स्वातंत्र्य दिनी होण्याची शक्यता आहे, अशा चर्चेला उधाण आले होते.एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा एकत्रितपणे पार पाडण्यात येत आहे. मात्र सुरक्षिततेचे सारे नियम पाळूनच ही सर्व प्रक्रिया सुरू आहे.कोणतेही दुष्परिणाम नाहीतएम्सचे प्रमुख संशोधक व लसनिर्मिती विषयातील तज्ज्ञ डॉ. संजय राय यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या चाचणीचे आतापर्यंत हाती आलेले निष्कर्ष समाधानकारक आहेत. या लसीचे कोणावरही दुष्परिणाम झाल्याचे आढळून आलेले नाही. मानवी चाचणीत सहभागी झालेल्यांना आम्ही या लसीचा एकच डोस दिला होता. आता आम्ही त्यांना डबल डोस देऊ. त्याचे निष्कर्ष येत्या १० ते १५ दिवसांत हाती आल्यानंतर मग मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली जाईल.लाल फीतशाही टाळण्यास उपायकोव्हॅक्सिनच्या चाचण्या लाल फितीच्या कारभारात अडकू नये या कारणासाठी सरकारने या लसीच्या मानवी चाचणीचा पहिला व दुसरा टप्पा एकत्रित करणार असल्याचे दर्शविले होते. या चाचणीमध्ये सुरक्षिततेचे सारे निकष पाळले जातील, असे एम्सचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय म्हणाले.
CoronaVirus News: कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा अद्याप अपूर्णच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 5:20 AM