नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आढळल्याने रुग्णांची संख्या ९,२०४ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत ३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यत देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढविण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेबरोबर सामान्य लोकांच्या मदतीसाठीही पाऊल उचललेले आहे. मागील महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सरकारने आतापर्यंत समाजातील विविध वर्गांसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर नोकरदार आणि करदात्यांसाठीही सरकारने अनेक निर्णयांची घोषणा केली आहे.
ईपीएफ काढणे
सरकारने कोरोना विषाणूच्या संकटामुळे नोकरदारांसमोर आलेल्या अडचणी पाहता एक विशेष तरतूद केली आहे. त्या अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) खात्यातून तीन महिन्यांइतके वेतन काढण्याची सूट दिली आहे. या रकमेवर सेवा शूल्काचीही सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
जीएसटी विवरणपत्र
मार्च, एप्रिल आणि मेसाठी जीएसटी विवरणपत्र भरण्याची कालमर्यादा ३० जून २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
कर परतावा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक करदात्यांना १८ हजार कोटी रुपयांचा कर परतावा त्वरीत जारी करण्याची घोषणा केली. तसेच ५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित कर परतावा आणि जीएसटी/कस्टम परतावा त्वरीत जारी केले जातील अशी सूचना कर विभागाने दिली.
आधार-पॅन लिंकिंग
आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची कालमर्यादाही ३१ मार्चवरुन ३० जून २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताला.
प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्राप्तीकर भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जून २०२० केली आहे. उशिराने प्राप्तीकर भरल्यास द्यावे लागणारे व्याज १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.
भारतात 'कोरोना बॉम्ब' फोडण्याच्या तयारीत; नेपाळच्या राजकारण्याला अटक
मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'दुकाने', उद्योग सुरु ठेवण्याची मुभा
आय अॅम सॉरी! गंगा किनारी १० परदेशी फिरताना सापडले; शिक्षा पाहून 'हसाल'