रांची – जगभरात कोट्यवधी लोक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा १० लाखांच्या वर पोहचला आहे. कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. यातच झारखंडमधील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे एकाच कुटुंबातील एका पाठोपाठ ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे पहिल्यांदा आईचा मृत्यू झाला त्यानंतर आईला खांदा देणाऱ्या ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसात या कुटुंबात ६ जणांचा मृत्यू झाल्यानं दु:खं व्यक्त करण्यात येत आहे. मयत महिला आणि मुलांशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांचीही तब्येत बिघडल्याची माहिती आहे. देशात कदाचित ही पहिली दुर्दैवी घटना असेल ज्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील धनबादच्या कतरास येथील ही घटना आहे. राणी बाजारात राहणाऱ्या एका कुटुंबातील ६ सदस्यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माहितीनुसार ४ जुलै रोजी ८८ वर्षीय आईचं बोकारो येथील नर्सिंग होममध्ये निधन झालं. मृतदेहाच्या तपासणीनंतर महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. यानंतर महिलेच्या एका मुलाचा मृत्यू रांचीमधील रिम्स कोविड रुग्णालयात झाला. काही दिवसानंतर दुसऱ्या मुलाला केंद्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथे त्याचाही मृत्यू झाला.
मृत्यूचं तांडव इथेच थांबले नाही तर तिसरा मुलगा धनबादच्या एका खासगी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला. त्याठिकाणी त्याची तब्येत बिघडली आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. १६ जुलै रोजी चौथा मुलगा टीएमएच जमशेदपूरमध्ये कॅन्सच्या आजारामुळे मृत्यू झाला. पाचवा मुलगा धनबाद कोविड रुग्णालयातून रिम्स रुग्णालयात हलवलं. ज्याठिकाणी सोमवारी या मुलानाही अखेरचा श्वास घेतला. कोरोना संक्रमित वृद्ध आईपाठोपाठ घरातील ५ सदस्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरु आहेत. या कुटुंबाचं दु:ख कोणी ऐकलं तरी त्याच्या मनाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जूनमध्ये ही महिला दिल्लीत एका लग्न समारंभात हजर राहून कतरास येथील तिच्या राहत्या घरी आली, त्यानंतर तिची तब्येत बिघडली, तेव्हा महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. स्थानिक लोकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच घरात लग्नाचं वातावरण होतं, हसतं खेळतं कुटुंब आनंदात मग्न होतं. पण काळाने घात केला अन् एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला.