coronavirus : कोरोनाविरोधात जात धर्म विसरून एकत्र या, राहुल गांधींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:05 PM2020-04-06T18:05:27+5:302020-04-06T18:09:34+5:30
आज देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्या वर पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशवासीयांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवाहन केले आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर रूप धारण करत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्या वर पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशवासीयांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवाहन केले आहे. राहुल गांधींनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी एकतेचा मंत्र दिला आहे. देशवासीयांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी जातधर्म विसरून एकत्र यावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून ह आवाहन केले आहे. त्यात राहुल गांधी म्हणतात की, कोरोना विषाणूचे संकट हे अमच्यासाठी एक होण्याचे संकट आहे. त्यामुळे सर्वांनी जात धर्म विसरून कोरोनाला पराभूत करण्याच्या इराद्याने एकत्र आले पाहिजे. या खतरनाक विषाणूला नामवण्यासाठी करुणा, सहानुभूती आणि आत्मबलिदान यांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. एकत्र राहूनच आपण कोरोनाविरोधातील ही लढाई आपण जिंकू शकतो.
देशात कोरोनाच्या फैलावाला पायबंद घालण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी विविध धर्माच्या धर्मगुरूंशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी सर्व धर्माच्या अनुयायांना लॉक डाऊनचे पालन करण्याची सूचना करण्याचे आवाहन मोदींनी धर्मगुरूंना केले होते.