मुंबई - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी मोदींनी PM-CARES फंडची निर्मिती केली आहे. मोदींनी PM-CARES फंडच्या माध्यमातून देशातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचे आवाहन केल आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण पुढे येत आहेत. माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार पी चिदंबरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान दिलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊच्या काळात राज्यातील जनतेला घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. सरकार लोकांची मदत करत आहे तुम्हीही सरकारला सहकार्य करा, कोरोनाशी लढण्यासाठी वेगळं खातं उघडलं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेगळा विभाग केला आहे. उदय कोटक यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे येऊन मदत करतायेत. सध्याच्या घडीला कोणताही देश मदतीसाठी पुढे येणार नाही. त्यामुळे आपणच एकत्र मिळून संकटाला मात करणं गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेने प्रतिसाद देत, कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान दिलंय. श्री सिद्धीविनायक संस्थान आणि श्री शिर्डी साई संस्थानानेही कोट्यवधींचे दान दिले आहे. खासदार नारायण राणे यांनीही पंतप्रधान सहायता निधीसाठी १ कोटी रुपयांची देगणी दिली. तर, काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिदंबरम यांचे ट्विटरवरुन आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अदानी फाऊंडेशननं PM-CARES फंडसाठी १०० कोटी रुपये दिले आहेत. या मदतीव्यतिरिक्त आम्ही सरकार आणि जनतेची शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू, असंही अदानी फाऊंडेशननं सांगितलं आहे. अदानी ग्रुपशिवाय जेएसडब्ल्यू समूहानंही कोरोनाविरोधातील लढ्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली समूहानं आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक उपकरणे देणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच या कंपनीचे कर्मचारी एका दिवसाचं वेतनही दान करणार आहेत. सध्याचे कोरोनाचे संकट पाहता आपत्कालीन परिस्थितीत जेएसडब्ल्यू ग्रुप 'पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत निधी' (पीएम-केअर फंड)मध्ये १०० कोटी रुपये देणार आहे, असंही जेएसडब्ल्यू समूहानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
सेलो ग्रुपने PM-CARES फंडसाठी साडेतीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी समूहाचे अध्यक्ष प्रदीप व पंकज राठोड यांचे आभार व्यक्त केले आहेत. याशिवाय अक्षय कुमारने 25 कोटी देण्याची घोषणा केली आहे, टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनीही 11 कोटी देण्याचं जाहीर केलं आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मोदींनी PM-CARES फंडची घोषणा केली होती. देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी, PM-CARES फंडच्या अकाउंट संदर्भातील महत्वाची माहितीही पोस्ट केली होती. PM-CARES फंडाच्या माध्यमातून मायक्रो डोनेशनही स्वीकारले जाईल. आपले हे डोनेशन आपत्ती व्यवस्थापन क्षमता बळकट करेल आणि नागरिकांच्या संरक्षणावरील संशोधनास प्रोत्सहित करेल. आपल्या भवी पिढ्यांसाठी निरोगी आणि अधिक समृद्ध भारत बनवण्यासाठी कसलीही कसर सोडू नका, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.