नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांना घऱातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. देशात सोमवारच्या आकडेवारीनुसार कोविड-१९ चे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला होता. रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. त्यानंतर, मंगळवारी यामध्ये आणख वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २४ तासांत देशातील २२७ कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, स्थलांतरीत आणि विदेशातून देशात आलेल्या अनेक नागरिकांनी आपली ओळख लपवल्याने प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळेच, अचानपणे विविध राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. देशात आत्तापर्यंत म्हणजेच मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२५१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये गेल्या २४ तासात तब्बल २२७ रुग्ण आढळले आहेत. देशातील १२५१ रुग्णांपैकी १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या १११७ रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोना व्हायसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात एकूण १२५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४९ विदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत देशातील केरळ राज्य आघाडीवर असून केरळमध्ये २०२ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर, महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून राज्यात १९८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यत ८ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.