नवी दिल्ली- कोरोना काळाच्या दुसऱ्या लाटेत भारताला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. कोविडच्या दुसऱ्या लाटेत २ लाखाहून अधिक लोकांचा जीव गेला. ज्यावेळी दुसरी लाट शिखरावर होती तेव्हा स्मशान भूमी, क्रबिस्तानला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्याचं विदारक चित्र समोर आलं होतं.
याच काळात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत मोठ्या संख्येने मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आले. ही सर्व मृत्यू कोरोनामुळे झाल्याची शंका लोकांनी व्यक्त केली होती. कोरोना काळात मृतदेह नदीत फेकून देत असल्याचेही व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाले. या व्हिडीओ आणि फोटोमुळे गंगा नदीच्या पाण्यात कोविड संक्रमण झाल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु होती. परंतु आता याबाबतीत नवा रिसर्च समोर आला आहे. गंगा नदीच्या पाण्यात कोरोना विषाणूचा कोणताही अंश नाही असा दिलासादायक दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात नदीत मिळालेल्या मृतदेहानंतर सरकारकडून रिसर्च करण्यात आला. या संशोधनात गंगा नदीच्या पाण्यात कोरोना विषाणूचे घटक नसल्याचं समोर आलं आहे. बुधवारी याबाबत माहिती लोकांना सांगण्यात आली. याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातंर्गत असणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन, वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद, भारतीय विष विज्ञान संस्थान आणि केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन करण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे संशोधन दोन टप्प्यात करण्यात आले. यात कन्नौज, उन्नाव, हमीरपूर, प्रयागराज, वाराणसी, बलिया, बक्सर, गाजीपूर, पटना आणि छपरा येथील पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. याठिकाणी मोठ्या संख्येने मृतदेह पाण्यावर आढळले होते. या पाण्याचे एकत्रित नमुने तपासले असता त्यात कोणत्याही प्रकारे सार्स COV 2 चे घटक आढळले नाहीत. वायरॉजिकल संशोधनात पाण्याच्या नमुन्यातून व्हायरसचा आरएनए काढला गेला. जेणेकरून पाण्यातील वायरल आरटीपीसीआर चाचणी केली जाऊ शकते. या रिपोर्टमुळे लोकांच्या मनातील संशय दूर होण्यास मदत मिळणार आहे.