तिरुवनंतपुरम - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे बहुतांश लोक जीव मुठीत धरून घरी बसून आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्वच व्यक्ती दीर्घकाळ घरातच राहू लागल्याने त्याचा नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. असाच पती-पत्नीचे नाते आणि मित्रत्वाला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात समोर आला आहे.
येथील एका व्यक्तीची पत्नी त्याच्या बालपणीच्या मित्रासोबत पळून गेली आहे. या व्यक्तीने आपल्या या मित्राला लॉकडाऊनदरम्यान घरात आश्रय दिला होता. मात्र या मित्राने मैत्रिचा गैरफायदा घेत आपल्याला आश्रय देणाऱ्या मित्राचेच कुटुंब उदध्वस्त केले.
केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार येथे राहणारा आणि एर्नाकुलममधील एका खासगी कंपनीत काम करणारा एक ३२ वर्षीय तरुण आपल्या बालपणीच्या मित्राला लॉकडाऊनदरम्यान भेटला. त्यावेळी हे दोघेही मुवत्तुपुझा शहरात अडकले होते.बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या मित्राची दया आल्याने सदर तरुण या मित्राला आपल्या घरी घेऊन गेला. त्याला आसरा दिला. मात्र १ मे रोजी एर्नाकुलम जिल्हा ग्रीन झोन घोषित झाल्यानंतरही हा मित्र घर सोडण्याचे नाव घेत नसल्याने सदर तरुणाला शंका आली.
दरम्यान, गेल्या आठवड्यात सदर तरुणाची पत्नी मुलांना घेऊन बेपत्ता झाली होती. मात्र त्यावेळी पोलीस तक्रार झाल्यानंतर सदर महिला ही मुलांना घेऊन पोलिसांसमोर हजर झाली होती. त्यानंतर या महिलेच्या पतीने तिला स्वीकारले होते. तसेच पोलिसांसमोर त्यांनी एकत्र राहण्याचे मान्य केले होते.
मात्र काही दिवसांनंतर ही महिला पुन्हा आपल्या प्रियकर असलेल्या पतीच्या मित्रासोबत पसार झाली. तसेच या महिलेने आपल्या मुलांनाही सोबत नेले आहे. तसेच पतीने तिच्या नावावर खरेदी केलेली कार आणि दागदागिने सुद्धा तिने सोबत नेले आहेत.