Coronavirus : राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:30 PM2020-04-07T18:30:47+5:302020-04-07T18:46:44+5:30
भारतानं हे निर्बंध न हटवल्यास कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
नवी दिल्लीः कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला असून, त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला सध्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (hydroxychloroquine) औषधाची गरज आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोरोनावार रामबाण ठरत आहे. भारतानं या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले असल्यानं अमेरिकेला होणारी निर्यातही थांबली होती. त्यानंतर भारतानं हे निर्बंध न हटवल्यास कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना आता काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही उपदेशाचे डोस पाजले आहेत. राहुल गांधी यांनी ‘जीवन वाचवणारी’ ही औषधे सर्वात आधी भारतीयांना उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. “मैत्रीमध्ये बदला घेण्याची भावना योग्य नाही. भारताने या कठीण समयी सर्वच देशांना मदतीचा हात द्यायला हवा. पण जीव वाचवणारी ही औषधे सर्वात आधी भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजेत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
दुसरीकडे ट्रम्प यांच्या या धमकीला विदेश मंत्रालयाने सणसणीत उत्तर दिलंय. सर्वप्रथम भारताजवळील गरजवंत देशांना आम्ही हायड्रोक्सिक्लोरोक्विन गोळ्यांची पूर्तता करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलं होतं.Friendship isn’t about retaliation. India must help all nations in their hour of need but lifesaving medicines should be made available to Indians in ample quantities first.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 7, 2020
भारतानं अमेरिकेशी चांगले संबंध राखले आहेत. त्यामुळे अमेरिका एखादं औषध मागत असल्यास त्यावरील निर्बंध कायम ठेवण्यासाठी भारताकडे कोणतंही कारण नाही, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'हा त्यांचा (पंतप्रधान मोदींचा) निर्णय असल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही. त्यांनी हे औषधं इतर देशांमध्ये पाठवण्यावर निर्बंध लादले आहेत, याची मला कल्पना आहे. मी काल त्यांच्याशी संवाद साधला होता. आमच्यात चांगली चर्चा झाली. भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध उत्तम आहेत,' असं ट्रम्प पुढे म्हणाले.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पाठवण्याबद्दल विचार करू, असं पंतप्रधान मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती त्यांनी दिली. मोदींनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचं कौतुकच करू, असं ट्रम्प म्हणाले. मोदींनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीला परवानगी दिली नाही तरीही ठीक आहे. मग आम्ही प्रत्युत्तरादाखल आवश्यक कारवाई करू आणि ती करायलाच हवी ना?, असा प्रश्न उपस्थितांना विचारत ट्रम्प यांनी भारताला अप्रत्यक्षपणे इशारा दिला.