वाराणसी - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले असताना उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित मृतदेह मोठ्या प्रमाणात गंगेमध्ये सोडले जात असल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. (Coronavirus in India) तसेच कोरोनाबाधित मृतदेहांमुळे गंगेच्या पाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढणण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर गंगेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. आता या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आला आहे. ( Samples taken for corona test from 16 places were negative)
गंगेमध्ये एकूण १६ ठिकाणांहून गंगाजलाचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आली होती. त्यांची चाचणी लखनौ येथील बिरबल साहानी इंस्टिट्युट ऑफ पॅलिओ सायन्स येथे करण्यात आली. आश्चर्यकारक बाब म्हणजे इतर नद्यांमधील कोरोना चाचणीचे काही नमुने पॉझिटिव्ह येत असताना गंगेतील सर्व नमुन्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला असून, गंगा नदी ही पूर्वीप्रमाणेच पवित्र असल्याचा गृहितकाला दुजोरा मिळाला आहे.
वाराणसीमधील १६ ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी सुमारे एका महिन्याचा अवधी लागला. मात्र दीर्घकाळानंतर आलेल्या या अहवालानंतर गंगाप्रेमींना दिलासा मिळाला आहे. बीएचयूमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गंगाजलामध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे असे घडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गंगाजलाचे सर्व नमुने हे जिथे गंगेचे पाणी हे काहीसे संथ आहे अशा ठिकाणाहून गोळा करण्यात आलेले होते. तसेच ज्यावेळी गंगेमध्ये मृतदेह सोडण्यात येत होते अशा वेळीही गंगाजलाचे नमुने घेण्यात आले होते. आता तज्ज्ञ देशातील इतर नद्यांमधील नमुने घेऊन त्यांची तपासणी करणार आहेत. त्यामाध्यमातून गंगाजलामध्ये असलेल्या काही विशेष गुणधर्मामुळे नमुने निगेटिव्ह आलेत का याची चाचपणी करणात आहेत. दरम्यान, सध्या गंगेमध्ये शेवाळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आता तज्ज्ञ या शेवाळांचा कोरोनाशी काही संबंधी आहे का याचाही शोध घेणार आहेत.