नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 4000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. भाजपाचा खासदार गौतम गंभीरने दिल्ली सरकारच्या मदतीसाठी आणखी 50 लाखांची मदत केली आहे. नवी दिल्लीतील विलगीकरण कक्ष आणि कोरोनासंदर्भात सरकारी वैद्यकीय यंत्रणांना मोठी गरज भासत आहे. दिल्ली सरकारने त्याने केलेली मदत नाकारल्याचा आरोप गंभीरने केला आणि आता अतिरिक्त 50 लाखांची म्हणजे एकूण 1 कोटी रुपये खासदार निधीतून देण्याचं जाहीर केलं. गंभीरने केलेल्या आरोपाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गौतम गंभीर यांनी देऊ केलेल्या एक कोटी रुपयांच्या मदतीबाबत आभार मानले आहेत. 'आम्हाला पैशांची समस्या नाही आहे. तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची (PPE) आवश्यकता आहे' असं म्हणत केजरीवालांनी गौतम गंभीरकडे पीपीई उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'गौतमजी तुमच्या प्रस्ताबाबद्दल धन्यवाद. मात्र पैशांची समस्या नाही आहे तर पीपीई किट्सची उपलब्धता ही मोठी समस्या आहे. तुम्ही तातडीने आम्हाला पीपीई किट्स उपलब्ध करुन दिल्यास आम्ही तुमचे आभारी राहू. दिल्ली सरकार त्या किट्स खरेदी करेल. धन्यवाद' असं ट्विट केलं आहे.
गौतम गंभीरनं यापूर्वी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत केली होती आणि दोन वर्षांचा पगारही दान करण्याचा निर्णय घेतला होता. दोन आठवड्यापूर्वी गंभीरने दिल्ली सरकारला 50 लाखांची मदत जाहीर केली होती. त्यात आता अतिरिक्त 50 लाखांची भर घातली आहे. ''दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निधीची गरज असल्याचे सांगत आहेत. मी यापूर्वी त्यांना खासदार निधीतून 50 लाखांची मदत देऊ केली होती, परंतु इगोमुळे त्यांनी ती घेतले नाही. त्यामुळे मी आणखी 50 लाख मदत करण्याचे जाहीर करतो. जेणेकरून सामन्यांचे हाल होऊ नये. 1 कोटीच्या मदतीनं मास्क घेता येतील आणि PPE किट्सही लवकर घेता येतील'' असं गंभीरने म्हटलं होतं. त्यानंतर त्याला आता केजरीवालांनी उत्तर दिलं आहे.
कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000 हून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 693 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत
Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्...
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक
Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम