नवी दिल्ली - राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबाबत संताप व्यक्त केला होता. तर, परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याचं जाहीर केलं. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या निर्णयाचे भारताचा माजी फलंदाजानं कौतुक केलं आहे. त्यानंतर, टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि खासदारगौतम गंभीर याने दिल्लीतील सरकारी रुग्णालयास ५० लाख रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
देशभरात कोरोनाची संख्या आणि संशयित रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन वैद्यकीय सेवेचा अभाव जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था, उद्योजक वैद्यकीय क्षेत्रासाठी पुढाकार घेत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. उद्योजक महिंद्रा यांनीही आपले हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे, विलगीकरण कक्ष आणि कोरोनासंदर्भात सरकारी वैद्यकीय यंत्रणांना मोठी गरज भासत आहे. भाजपाचे दिल्लीतील खासदारगौतम गंभीर यांनी आपल्या खासदार निधीतून दिल्लीतील सरकारी रुग्णालयास ५० लाख रुपयांचा निधी देऊ इच्छित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, दिल्लीतील सरकारी रुग्णालयात कोरोनासंदर्भात रुग्णांसाठी, किंवा संशयित रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात.
गौतम गंभीर नेहमीच आणीबाणीच्या काळात, म्हणजेच संकट, आपत्तीच्या काळात पुढे येऊन आपले कर्तव्य बजावत असतो. खासदार होण्यापूर्वीही गंभीरने सैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांसाठी पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला होता. आता, खासदार झाल्यानंतरही आपल्या कामातून गंभीर नागरिकांची सेवा करत असतो. आता, कोरोनाचे संकट ओळखून गंभीरने सरकारी रुग्णालयांना ५० लाख रुपये देऊ केले आहेत.