भोपाळ - जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना व्हायरसाचा प्रार्दुभाव चीनच्या वुहान शहरातून पहिल्यांदा झाला. चीन सरकारने वुहान शहरात लॉकडाउन केलं होतं. लाखो लोकांना घरातच बंदिस्त करण्यात आलं. त्यामुळे वुहान शहरातून कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत झाली.
वुहान शहरात राहणारी एक युवती मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आली. पोलिसांनी या युवतीला कोरोना संशयित म्हणून भोपाळच्या जेपी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याठिकाणाहून या युवतीने पळ काढला. मागील ४ महिन्यांपासून ही युवती भारतात फिरत आहे. कोरोना अलर्ट आणि चीनच्या वुहान शहरात राहणारी असल्यामुळे एकही हॉटेल चालक तिला राहण्यासाठी रुम उपलब्ध करुन देत नाही. शेवटी ही युवती हबीबगंज स्टेशनला पोहचली त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.
या युवतीला आरोग्य तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. युवतीची कोरोनाची तपासणी करण्यात आली त्याचा रिपोर्ट बुधवारी सकाळी येणार होता. मात्र बुधवारी डॉक्टर्स हॉस्पिटलला पोहचण्यापूर्वीच युवतीने हॉस्पिटलमधून पळ काढला. चीनची युवती वांगने सांगितले की, ४ महिन्यापूर्वी जगातील विविध देशांमध्ये भटकंती करण्यासाठी चीनहून सिंगापूरला गेली होती. २४ जानेवारी मी दिल्लीला आली. दिल्लीमध्ये फिरुन झाल्यानंतर वुहानसाठी निघाली असताना मला आई-वडिलांनी फोन करुन तिथं येण्यापासून रोखलं. त्यानंतर राजस्थान, जयपूर, जोधपूर, उदयपूर, बीकानेर, आग्रा, लखनऊसह अन्य शहरात तिने भटकंती केली. जेपी रुग्णालयात उपचार घेताना तिने डॉक्टरांना सांगितले की, तिला पुन्हा चीनला जायचं आहे पण सध्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहेत. त्यामुळे ती भारतामध्येच अडकली आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली होती. त्यानंतर आता गुरुवारी (19 मार्च) 146 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील 16 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील काहींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.