पणजी - सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशातील रुग्णांची संख्या 15 हजारांवर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 500 पार झाला आहे. मात्र या चिंतेच्या वातावरणात दिलासा देणारी एक बातमी आली आहे. काही राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना देशातील एक राज्य मात्र कोरोनामुक्त झाले आहे.
देशातील पर्यटनाचे केंद्र आणि सतत देशी विदेशी पर्यटकांची वर्दळ असणारे गोवा राज्य कोरोनामुक्त झाले आहे. गोव्यामध्ये कोरोनाचे सात रुग्ण होते. दरम्यान, हे सातही रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कोरोनामुक्त झाले असल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले. सावंत यांनी सांगितले की, 'गोव्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही याचा आनंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही गोव्यात जनता कर्फ्यु दोन दिवस अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आमच्यावर टीकाही झाली होती. मात्र नंतर आम्ही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची पद्धत सुधारली. गोव्यात 25 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित सापडला होता. त्यानंतर आम्ही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला. संशयितांना क्वारेंटाईन केले. तसेच राज्यात विमानतळावरून आलेल्या प्रत्येकाला क्वारेंटाईन केले. राज्यात 10 ते 12 क्वारेंटाईन सेंटर सुरू केली. आमचे आरोग्य मंत्रालय, आरोग्य कर्मचारी यांनी चांगले काम केले. त्यामुळे हे सर्व शक्य झाले.'