इंदूर - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक फैलाव झाला नसला तरी काही ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत महिनाभरापूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या इंदूरमधून आता एक दिलासादायक बातमी आली आहे. या शहरात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले असून, रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधीही वाढला आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्यानंतर त्याचा सर्वाधिक प्रकोप मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये दिसून आला होता. येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. आतापर्यंत इंदूरमध्ये कोरोनाचे १६५४ रुग्ण सापडले असून, ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र गेल्या १७ दिवसांपासूनची आकडेवारी पाहिल्यास इंदूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक घटत चालली आहे. तसेच राष्ट्रीय सरासरीचा विचार केल्यास कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेगही कमी झाला आहे. त्यामुळे इंदूर कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इंदूरचे सीएचएमओ डॉ. प्रवीण जडिया यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा इंदूरची स्थिती चांगली आहे. शहरामध्ये कठोरपणे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन यासाठी उपयुक्त ठरले, अशी माहिती त्यांनी दिली.
इंदूरमध्ये आशा, एएनएम आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या सुमारे दोन हजार पथकांनी गेल्या महिन्यात पाच लाखांहून अधिक घरांचा सर्वे केला. या लोकांनी कोरोनाबाबत जनजागृती करतानाच संशयितांबाबत योग्य माहितीही गोळा केली, त्यामुळे फार मदत झाली, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह
CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर
coronavirus: गुजरातमधील सूरत येथे मजुरांकडून पुन्हा गोंधळ, पोलिसांवर केली दगडफेक
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळले असून 195 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 46, 433 वर, तर त्यांपैकी 12,727 रुग्ण बरे झाले आहे. तर आता एकूण 32,134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.