नवी दिल्ली - जवळपास महिनाभर लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाची चिंता वाढली असून, सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, एकीकडे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला कोरोनाविरोधातील लढाईत देशाला तीन आघाड्यांवर मोठे यश मिळाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर या आघाड्यांवर देशाला मोठे यश मिळत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आग्रवाल यांनी केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याला लागणारा कालावधी वाढला
लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणाला कालावधी वाढला आहे. लॉकडाऊनपूर्वी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी ३ ते ४ दिवस लागल होते. मात्र आता हा कालावधी आता ११ दिवस झाला आहे. त्यातही काही राज्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यांनी सांगितले की, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, ओदिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ११ ते २० दिवस आहे. तर कर्नाटक, लडाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळ येथे रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी २० ते ४० दिवस एवढा आहे. तर आसाम, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ४० दिवसांहून अधिक झाला आहे.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी घटली
देशात आतापर्यंत १ हजार ७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी ही ३.२ टक्के एवढी आहे. भारतात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिला आहेत. भारतात कोरोनामुळे मृत्यमुखी पडणाऱ्यांमध्ये ४५ वर्षांखाली व्यक्तींचे प्रमाणा १४ टक्के तर ४५ ते ६० या वयोगटातील ३४.८ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६० वर्षांवरील ५१.२ टक्के कोरोनाबाधितांचा मृ्त्यू झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले
कोरोनाविरोधातील लढाईमधील अजून एक समाधानकारक बाब म्हणजे देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील कोरोनाबाधित रु्ग्णांची बरे होण्याची टक्केवारी २५.१९ पर्यंत पोहोचली आहे. दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर १३.०६ टक्के एवढाच होता. या आकडेवारीवरून देशाला या तीन आघाड्यांवर यश मिळाले आहे.