नवी दिल्ली : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी 'गिव्ह इंडिया'ला (Give India) पाच कोटी रुपये दिले आहेत. 'गिव्ह इंडिया'ने यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी गुगलकडून पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल सुंदर पिचाई यांचे आभार मानले आहेत.
जगभरात कोरोना व्हायसरन थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी याआधी गुगलने ८० कोटी डॉलरची मदत करण्याची घोषणा केली होती. यामध्ये एनजीओ आणि बँकांसाठी २० कोटी डॉलरचा समावेश आहे, ज्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांसाठी मदत केली जाणार आहे.
भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे 'गिव्ह इंडिया'ने सध्या देशातील गरजूंना आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांना मदत करण्यासाठी अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत २० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.
देशातील मोठ्या कंपन्याही कोरोनाच्या लढ्यात सामील झाल्या आहेत.Tata Trusts and Tata Sons ने १५०० कोटी रुपये दिले आहेत. तर विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायजेस लिमिडेट आणि अजीम प्रेमजी फाऊंडेशनने एकूण ११२५ कोटी रुपयांची मदत केली आहे.
दरम्यान, सुंदर पिचाई यांच्यासह इतर आयटी कंपन्यांनी कोरोना कोरोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटर इंडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी यांनीही कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्या खासगी संपत्तीतून एक अरब डॉलर देण्याची घोषणा केली होती. याशिवाय, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनीही ३० मिलीयन डॉलर इतका निधी दिला आहे.