नवी दिल्ली – भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये केलेला दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापण्यात आलेला रिपोर्ट पूर्णपणे निराधार आहे. कोणत्या पुराव्यावर हा रिपोर्ट बनवला आहे असा सवालही केंद्र सरकारने केला. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यात ऑक्सिजन आणि उपचाराअभावी अनेकांचा जीव गेल्याच्या बातम्या आल्यात. त्यातच न्यूयॉर्क टाइम्सच्या दाव्यानुसार भारतात कोरोनामुळे तब्बल ४० लाख मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.( New York Times report on COVID-19 toll in India is ‘completely baseless’ Says Central Government)
यावर केंद्र सरकारकडून निती आयोगाचे सदस्य व्ही. के पॉल म्हणाले की, या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. चुकीच्या माहिती आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कशाच्या आधारावर तयार करण्यात आली? ५ लोकांनी फोन करून चौकशी करून रिपोर्ट तयार केला. कोणत्याही आधाराशिवाय मृत्यूची संख्या १२ पटीनं वाढवण्यात आली. जर हीच बाब न्यूयॉर्कबाबत लागू केली तर? असंही त्यांनी विचारलं आहे.
न्यूयॉर्कबाबत म्हणाल तर त्याठिकाणी मागील वर्षी मे महिन्यात २ लाख कोरोनाबाधित होते. तर सेरो सर्व्हेमध्ये १७ लाख लोक संक्रमित असल्याचं सांगण्यात आलं होतं. जर सेरो सर्व्हेच्या आकडेवारीवर नजर टाकली तर संक्रमणातून मृत्यूचा दर ०.५ टक्के इतका आहे. तर वास्तविक मृत्यूदर १.१. टक्के असल्याचं कळतं. आमच्याकडे आकडा ०.५ टक्के इतका आहे आणि रिपोर्टमध्ये तो ०.३ टक्के दाखवण्यात आला आहे म्हणजे ६ पट जास्त का? कोणत्या आधारावर आहे? असंही व्हि. के पॉल म्हणाले आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सचा दावा काय?
भारतात कोरोना संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा जाणून घेण्यासाठी १२ पेक्षा अधिक तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. या तज्त्रांनी भारतात कोरोना महामारीला तीन स्थितीत विभागणी केली आहे. यात सामान्य स्थिती, खराब स्थिती आणि अत्यंत खराब स्थिती. या तिघांमधील अत्यंत खराब स्थितीच्या रिपोर्टमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा २६ पटीनं जास्त अंदाज लावला आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर ०.६० इतका धरला आहे. हा अंदाज कोरोनाची दुसरी लाट आणि देशातील बिकट आरोग्य व्यवस्था हे पाहून लावला आहे. यात स्थितीत ७० कोटी लोक कोरोना संक्रमित झाल्यानंतर ४२ लाख लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतातील सध्याची स्थिती
भारतात कोरोना व्हायरसची एकूण रुग्णसंख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ इतकी आहे. त्यातील ३ लाख १५ हजार २३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ११ हजार २७५ कोरोनाबाधित आढळले आहेत तर ३ हजार ८४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ८२ हजार ९२४ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.