नवी दिल्ली - कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे. लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. मात्र यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला असून त्यांच्या किंमती वाढल्या आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी केंद्राने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राने मास्क आणि सॅनिटायझरची किंमत ठरवली आहे. यामुळे याचा काळा बाजार करणाऱ्यांवर चाप लागणार आहे.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. मास्क आणि सॅनिटायझरची किंमत ठरवण्यात आली आहे. 200 मिलीच्या आतील सॅनिटायझरची बॉटल ही 100 रुपयांच्या आतच विकली जाईल, इतर बॉटलची किंमतही आकारानुसार ठरवली जाईल असे पासवान यांनी दिले आहेत. तसेच या किंमती देशभरात 30 जून 2020 पर्यंत लागू असणार आहेत.
'कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाजारात विविध प्रकारचे मास्क, ते निर्माण करण्यासाठी लागणारं साहित्य आणि हँड सॅनिटायझरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. सरकारने हे गांभीर्याने घेत किंमती निश्चित केल्या आहेत. आवश्यक वस्तू अधिनियमानुसार 2 आणि 3 प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॅब्रिकची किंमत तीच असेल, जी 12 फेब्रुवारी 2020 रोजी होती. 2 प्लाय मास्कची किंमत 8 रुपये प्रति मास्क आणि 3 प्लाय मास्कची किंमत 10 रुपये प्रति मास्क पेक्षा अधिक असणार नाही' असं राम विलास पासवान यांनी म्हटलं आहे.
हँड सॅनिटायझरची 200 मिलीची बॉटल 100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकली जाणार नाही. इतर बॉटलही आकारानुसार दर ठरवलेल्या असतील अशी माहिती पासवान यांनी दिली आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय केले जात आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 11,267 वर पोहोचली आहे. तर जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,69,911 वर पोहोचली आहे. भारतातील अनेक राज्यांत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 258 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना
Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?