नवी दिल्ली : मोदी सरकार निर्दयी असून त्यांना ‘लॉकडाऊन’मुळे देशोधडीला लागलेल्या गरिबांची जराही कणव नाही, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी केली.टष्ट्वीटरवरून ही टीका करताना चिदम्बरम यांना पहिल्या टष्ट्वीटमध्ये लिहिले की, हाती पैसा नसल्याने अधिकाधिक लोकांना नाईलाजाने मोफत जेवण वाटपाच्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती भक्कम पुराव्यानिशी आता समोर येत आहे.दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये त्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले. सरकार या गरिबांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा करून त्यांची उपासमार व अब्रुचे धिंडवडे निघणे का थांबवीत नाही? अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये ७.७ कोटी टन अन्नधान्याचे साठे पडून असताना त्यातील काही धान्य सरकार या लोकांचे पोट भरण्यासाठी त्यांना मोफत का देत नाही? तिसरे टष्ट्वीट थेट पंतप्रधान मोदी व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या रोखाने करून चिदम्बरम यांनी लिहिले की, हे दोन्ही प्रश्न अर्थकारणाप्रमाणेच नैतिकतेशीही निगडित आहेत. पण मोदीव सितारामन त्यांची उत्तरे देऊ शकत नसल्याने देश हताशपणे पाहात राहिला आहे.‘लॉकडाऊन’ वाढविण्याच्या मोदी यांच्या घोषणेचे काँग्रेसने स्वागत केले असले तरी या निर्बंधांमुळे सर्वाधिक झळ पोहोचलेला समाजातील गरीब व शोषित वर्ग तसेच स्थलांतरित कामगार यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आणखी मानवीय दृष्टीने पावले उचलायला हवीत, असा आग्रह हा विरोधी पक्ष करत आहे.पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोनासंबंधी पक्षाची ध्येयधोरणे ठरविण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ११सदस्यीय सल्लागार गट शनिवारी नेमला आहे. चिदम्बरम त्याचे सदस्य आहेत.
'निर्दयी मोदी सरकारला गरिबांची कणव नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:16 AM