नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे संकट वाढू लागल्याने केंद्र सरकारने कोरोना योद्ध्यांसाठी म्हणजेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 50 लाखांच्या विम्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढविली आहे. याचा फायदा पुढील सप्टेंबरपर्यंत 22 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पहिल्या लॉकडाऊनवेळी देशभरातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांचा 30 जूनपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार होती. ही योजना न्यू इंडिया अशुरन्सद्वारे राबविण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजवेळी याची घोषणा केली होती. या योजनेची मुदत येत्या 30 जूनला संपत असल्याने ती सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात येणार आली आहे. ही योजना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून राबविण्यात येत आहे.
या कोविड विम्याचे संरक्षण केवळ सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना लागू होते. यामध्ये डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल, स्वच्छता कर्मचारी, केंद्र आणि राज्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे अन्य कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला होता. सीतारामन यांनी जाहीर करताना यामध्ये स्वच्छता कर्मचारी, वॉर्ड बॉय, नर्स, आशा सेविका, तंत्रज्ञ आणि अन्य आरोग्य सेवक येत असल्याचे म्हटले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व कोरोना योद्ध्ये यामध्ये येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. यानंतर खासगी हॉस्पिटलमधील कोरोना योद्ध्यांनाही या ५० लाखांच्या विमा योजनेचे संरक्षण असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
खासगी कर्मचाऱ्यांनाही संरक्षणखासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या कोविड विम्याचे संरक्षण देताना मंत्रालयाने स्पष्टता आणली होती. खासगी डॉक्टर किंवा कर्मचारी सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलला कोणत्याही एजन्सीद्वारे कोरोनाग्रस्तांना सेवा देत असेल तर तो या योजनेमध्ये येईल. या कर्मचाऱ्याचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला विम्याचे संरक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
रुग्णसंख्या सव्वाचार लाखांवरकोरोना व्हायरसने गेल्या महिनाभरापासून वेग पकडला असून तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. देशातील कोरोनाच्या रुग्णांनी ४ लाखांचा टप्पा गाठला असून हा आकडा 426910 वर गेला आहे. तर मृत्यूंची संख्या 13703 वर गेली आहे. तर 237,252 रुग्ण बरे झाले आहेत.
(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे. मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)