कोरोना रुग्णांना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) ने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाशी संबंधीत कोणताही आरोग्य विमा क्लेम फक्त ६० मिनिटांत मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने एका केसमध्ये आयआरडीएआयला हे आदेश दिले होते. (Delhi High Court order dated April 28 directed IRDAI to advise insurers to communicate their cashless approvals to hospitals within 30-60 minutes.)
दिल्ली उच्च न्यायालयाने असा आदेश दिलेला की, IRDAI ने विमा कंपन्यांना तातडीने कॅशलेस क्लेम निपटण्यासाठी आदेश द्यावेत. यानंतर IRDAI ने सर्व कंपन्यांना आदेश पारित करताना म्हटले की, कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर त्याचे सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण केल्याच्या ६० मिनिटांत कॅशलेस क्लेम मंजूर केला जावा.
उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे सर्व कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे हॉस्पिटलमधील बेडची समस्याही कमी होणार आहे. यामुळे रुग्णांना डिस्चार्ज करणे आणि नवीन रुग्णांना दाखल करणे सोपे होणार आहे.
रुग्णांना डिस्चार्ज करण्यास उशिर होऊ नये यासाठी दावा दाखल केल्याच्या तीस ते ६० मिनिटांत दावा मंजूर करावा, असे आदेश IRDAI ने दिले आहेत. या आधी IRDAI ने कंपन्यांना कॅशलेस क्लेमसाठी दोन तासांचा वेळ दिला होता. कोरोनाच्या पहिल्या संकटावेळी इरडानेच सर्व कंपन्यांना त्यांच्या विमाधारकांना कोरोना साथीपासून विमा संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. तसेच कोरोनासाठी विशेष विमा पॉलिसी बनविण्यासही परवानगी दिली होती.