नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. देशव्यापी लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपत असल्याने नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडे सर्व देशाचे लक्ष असणार आहे. याच दरम्यान भाषणाआधी पंतप्रधानांनी मंगळवारी (14 एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास एक ट्विट केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 'आज देशभरात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध उत्सवांनिमित्त सर्वांना शुभेच्छा. या उत्सावांच्या माध्यमातून देशामधील बंधुभाव वाढवणारी भावना निर्माण होवो. तसेच हे उत्सव तुमच्या आयुष्यात चांगले आरोग्य आणि आनंद घेऊन येतील. या उत्सवांमधून आपल्याला आगामी काळात कोरोना विरोधातील सामूहिक लढाईसाठी अधिक सामर्थ्य मिळू दे' असं ट्विट मोदींनी केलं आहे.
देशात लॉकडाऊननंतरही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. अशातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा या राज्यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं घोषित केले. मंगळवारी पंतप्रधान लॉकडाऊनबाबत काय घोषणा करतील याबाबत चर्चा सुरु आहे. पण तत्पूर्वी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्र्यांनी कार्यालयात जाऊन कामाला सुरुवात केली. त्यामुळे लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात काही निर्बंध शिथील केले जातील याचे संकेत मिळत आहेत.
अद्याप तरी नरेंद्र मोदी सरकारकडून देशातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र त्यापूर्वीच काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात देशात लॉकडाऊन वाढणार हे निश्चित आहे. पण लॉकडाऊन वाढणार ते आतासारखचं असणार की, दुसऱ्या टप्प्यात काही वेगळं असणार? हा प्रश्न उपस्थित होतो. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. पण दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता आणली जाणार असेही संकेत मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला
जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष
खासगी कोरोना चाचण्या आता फक्त गरिबांसाठीच, न्यायालयाचा नवा आदेश