केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळेच केरळ सरकारने राज्यात सर्वत्र मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे. याबाबत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या अंतर्गत सर्व लोकांना सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच, राज्य सरकारने लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोरोना संसर्गाचा प्रसार रोखता येईल.
सरकारच्या सूचनेनुसार, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची ही मार्गदर्शक तत्त्वे पुढील 30 दिवस राज्यात लागू राहतील. सर्व दुकाने, चित्रपटगृहे आणि विविध ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. सोमवारी देशात कोरोनाचे 114 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचे 2119 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोनामधून बरे होण्याचा दर 98 टक्क्यांच्या पुढे गेला आहे, ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
कोरोनाच्या XBB 1.5 प्रकाराने अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये कहर केला होता. भारतात या प्रकाराची 26 प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सध्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 10 आहे आणि या 9 पैकी 9 जणांवर त्यांच्या घरीच आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
भारतात सध्या जिथे कोरोनापासून दिलासा मिळत आहे, तिथे चीनमध्ये महामारीमुळे परिस्थिती बिकट आहे. चीनच्या पेकिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, चीनमधील 64 टक्के लोकसंख्या म्हणजेच सुमारे 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या हेनान प्रांतातील 89 टक्के, युनानमधील 84 टक्के आणि किंघाई प्रांतातील 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळेच आता चीनमधून पसरलेल्या कोरोना महामारीमुळे उर्वरित जगात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"