अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली. सध्या विजय रुपाणी यांची तब्येत ठीक आहे. मात्र, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते आपल्या घरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज पाहणार असल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे.
मंगळवारी काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत इम्रान खेडावाला यांची बैठक झाली होती. त्यामुळे विजय रुपाणी यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.
विजय रुपाणी यांनी आज सकाळी डॉ. आर. के. पटेल आणि डॉ. अतुल पटेल यांच्याकडून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. त्यांची तब्येत ठिक आहे. मात्र, सध्या ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, व्हिडीओ कॉलिंग आणि टेलिफोन कॉलच्या माध्यमातून काम करत आहेत. तसेच, पुढील आठवड्यापर्यंत कोणालाही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटण्यास परवानगी देण्यात आली नाही, असे, मुख्यमंत्र्यांचे सविच अश्विनी कुमार यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?अहमदाबादमधील जमालपूर-खाडियाचे काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला हे मंगळवारी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि गृहमंत्री यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत आणखी बरेच मंत्रीही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह हे सर्व मंत्री स्वत: ला क्वारंटाईन करुन घेत आहेत.
दरम्यान, जेव्हापासून आमदार इम्रान खेडावाला यांच्या विधानसभा मतदारसंघातून कोरोना संसर्गाची प्रकरणे येऊ लागली आहेत. तेव्हापासून आमदार इम्रान खेडावाला हे जमालपूर खडिया भागात लोकांमध्ये जाऊन त्यांना कोरोनापासून वाचण्यासाठी जनजागृती करत होते. या काळात संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तेसुद्धा कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सकाळी कोरोना चाचणीचे नमुना दिले होते. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.