नवी दिल्ली - चीनमधील वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 80 देशांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे इटलीहून भारतात परतले आहेत. त्यावेळी राहुल यांनी कोरोनाची चाचणी केलीय का? असा सवाल भाजपाच्या एका खासदारांनी केला होता. त्यानंतर आणखी एका खासदाराने देखील असंच म्हटलं आहे.
भाजपाच्या मित्रपक्षाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. सोनिया, राहुल, प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा असं बेनीयाल यांनी म्हटलं आहे. गुरुवारी (5 मार्च) लोकसभेत त्यांनी हे विधान केलं. विधानानंतर लोकसभेत गदारोळ झाला. 'भारतातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण इटालियन असून गांधी कुटुंबियांच्या घरात कोरोना असावा. त्यामुळे सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी हे कोरोनाने पीडित तर नाहीत ना, याची तपासणी व्हावी' असं हनुमान बेनीवाल यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या सदस्यांनी बेनीवाल यांच्या वादग्रस्त विधानावर तीव्र आक्षेप घेतला. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी बेनीवाल यांचे वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर उद्भवलेल्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाजही तहकूब केले. तसेच काँग्रेसच्या सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले. 'दिल्ली दंगलीमध्ये 53 जणांनी आपला जीव का गमावला याचा पंतप्रधान मोदी यांना जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षांविरुद्ध भाजपाने 'गोली मारो, गाली दो' मोहीम उघडली आहे. मोदींना गांधी आणि नेहरू कुटुंबीयांविरुद्ध फोबिया झाला आहे. त्याचे प्रतिबिंब बेनीवाल यांच्यासारख्या मानसिक संतुलन गमावलेल्यांच्या वक्तव्यांमधून उमटत असते' अशी टीका केली आहे.
इटलीहून परत आल्यावर राहुल गांधी यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीवरून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती?, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का? असं भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बुधवारी (5 मार्च) म्हटलं आहे. राहुल गांधी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे. राहुल गांधी इटलीहून परतले आहेत. आता विमानतळावर त्यांनी कोरोनाची तपासणी केलीय की नाही?, नागरिकांमध्ये जाण्यापूर्वी तरी राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी करायला हवी होती. हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असं म्हणत बिधुरी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द
एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा
महाविकास आघाडी सरकारच्या विविध मंत्र्यांनी १०० दिवसांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय
राज्याचा विकासदर घटला, बेरोेजगारीत दीड लाखांची वाढ