काश्मीर : कोरोनाने जगभरात दहशत माजवली आहे. देशातही कोरोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांनी तरीही बाहेर पडणे काही सोडलेले नाहीय. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना संतप्त होऊन कायद्याचे पालन करण्यास लावा असे निर्देश राज्य सरकारांना केले आहेत. याचवेळी मोठे दानशूर लोकही पुढे सरसावले आहेत.
कोरोनाने लडाख आणि काश्मीरमध्येही हजेरी लावली आहे. यामुळे संपूर्ण देश कोरोनाने व्यापला आहे. तिकडे केरळमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे देशासमोर धोक्याची घंटी वाजू लागली आहे. देश संकटात असताना दाणशूरपणाचे किस्सेही समोर येत आहेत. मुंबईत पोलिसांनी ज्यांना कोणीच वाली नाही अशा रस्त्यावर भटकणाऱ्यांना रोजचा चहा, नाश्ता आणि जेवण देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आजच्या या स्वार्थी वाटणाऱ्या जगात माणुसकीचा झरा आटला नसल्याचे दिसले आहे.
असाच एक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये पहायला मिळाला आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने आणि लडाखला वेगळे केल्याने काश्मीरमध्ये बरेच महिने संचारबंदी लागू केली होती. यामुळे तेथील व्यवहार ठप्प झाले होते. काश्मीरचे मुख्य उत्पन्न पर्यटनातून येते. हे उत्पन्न बुडाल्याने तेथील व्यावसायिक हवालदील झाले आहेत. तरीही एका दानशूराने त्याचे अख्खे आलिशान हॉटेलच कारोनशी लढण्यासाठी दिले आहे.
श्रीनगरचे पोलीस उपायुक्त शाहिद चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, टायगर झिंदा है पार्ट २ : मित्र सुहेल बुखाली यांनी त्यांच्या ४८ खोल्यांच्या आलिशान हॉटेलच्या चाव्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिल्या आहेत. हे हॉटेल त्यांनी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास सांगितले आहे.