वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही कोरोनामुळे ३ लाखांहून अधिक जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर, आतापर्यंत ७ हजार,९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली असून भारताकडून अमेरिकेला मदतीची अपक्षा आहे.
अमेरिकेत गेल्या २४ तासांत १४८० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेपाठोपाठ युरोपीयन देशांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर, दुबईत सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दुबई दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या या संकटाने त्रस्त झाल्यानेच शनिवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची फोनवरुन चर्चा झाली. त्यावेळी, ट्रम्प यांनी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) गोळ्यांची निर्यात करण्याचा आग्रह मोदींकडे केला. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरीक्वीन या गोळीचा उपयोग केला जातो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याचे सांगितलं. त्यावेळी, भारताकडून निर्यात बंद करण्यात आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरीक्वीन गोळ्यांची मागणी केली आहे. भारताची लोकसंख्या १ अब्जपेक्षा अधिक आहे, त्यामुळे तेथील नागरिकांनाही याची आवश्यकता भासणार आहे. मात्र, भारतात याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे, मोदींनी या गोळ्यांची निर्यात केल्यास, अमेरिकेत पाठविल्यास मी त्यांचा आभारी राहिल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मीही या गोळीचे सेवन करणार असून माझ्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर मी ही गोळी घेईल, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्र्रम्प यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती दिली होती.
दरम्यान कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये १४ हजार, ७०० तर स्पेनमध्ये ११ हजार, ८०० लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये (६,५००), ब्रिटन (४,३१५), इराण (३,५००), जर्मनी (१,३३०), नेदरलँड (१,६५०) तर बेल्जीयम (१,३००) असे मृत्यू झाले आहेत. चीनमध्ये मात्र गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे केवळ चारच जणांचा मृत्यू झाला असून तेथील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १,३२६ एवढी झाली आहे.