नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही वेगाने वाढत आहे. भारतातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजार 435 पर्यंत पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 934 झाला आहेत. आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार वर गेला आहे. याच दरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 7 दिवसांपासून देशातील तब्बल 80 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर 47 जिल्हे असे आहेत की जिथे मागच्या 14 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढलेला नाही. तर दुसरीकडे 21 दिवसांपासून देशाच्या 39 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित नवा रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे भारतातील 17 जिल्हे असे आहेत जिथे मागील 28 दिवसांपासून म्हणजेच जवळपास महिनाभरापासून कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 1543 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 29,435 झाली आहे. त्यातील 6,869 लोक बरे झाले असून 934 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर
Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!
CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत