देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. सध्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत असली तरी मृतांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे. या महासाथीमध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचा दुर्देवी प्रकार हरयाणामध्ये घडला आहे. हरयाणामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना सन्मानानं अंत्यसंस्कार करणाऱ्या प्रवीण कुमार यांचा कोरोमुळे मृत्यू झाला. हरयाणातील हिसार येथे आतापर्यंत त्यांनी ३०० पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार केले होते. सोमवारी रात्री ४३ वर्षीय प्रवीण कुमार यांचं कोरोनामुळेच निधन झालं.हिसार पालिकेद्वारे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. प्रवीण कुमार हे त्या टीमचे प्रमुख होते. प्रवीण कुमार यांना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती हिसार पालिकेच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. कोरोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात जाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यानं त्यांचं निधन झालं असल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली. प्रवीण कुमार हे पालिकेच्या सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्षही होते.
हरयाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढहरयाणामध्ये सोमवारी कोरोनाच्या नव्या ७,४८८ रूग्णांची नोंद झाली. यादरम्यान ११४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर हरयाणातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७,०१,९१५ वर पोहोचली आहे. हरयाणामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ६,७९९ रुग्णांचा मृत्यू झाला. हरयाणामध्ये गेल्या १५ दिवसांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या सरकारनं लॉकडाऊन २४ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.