वाराणसी - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक लोक विनाकारण बाहेर पडत असल्याने अशा लोकांना रोखणे ही पोलिसांसाठी डोखेदुखी ठरत आहे. दरम्यान, अशा लोकांना रोखण्यासाठी वाराणसीमधील पोलिसांनी एक हटके उपाय अमलात आणला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी पोलिसांनी लॉकडाऊन मोडणाऱ्यांची धरपकड करण्याबरोबरच त्यांची ओळख पटवण्यासाठी ही नवी पद्धत अमलात आणण्यात आली आहे. त्यानुसार आता लॉकडाऊन मोडणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्याबरोबरच त्यांच्या हातावर एक शिक्काही मारला जात आहे.
विनाकारण लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून विशेष करून हा शिक्का तयार करण्यात आला आहे. 'मी समाजाचा शत्रू आहे'', 'लॉकडाऊनचे उल्लंघन' असा उल्लेख या शिक्क्यावर करण्यात आला आहे.
आता जे कुणी लॉकडाऊनचे उल्लंघन करताना आढळत आहेत त्यांना पकडून त्यांच्या हातावर पोलीस ही मोहोर उमटवत आहेत. तसेच मी समाजाचा शत्रू आहे, असे त्यांच्याकडून वदऊन घेण्यात येत आहे. दरम्यान, घराबाहेर पडण्यासाठी दिलेला अवधी संपल्यानंतर विनाकारण बाहेर भटकणाऱ्यांना समजवण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.