नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी १० हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य देणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सरकारला पाच लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. सरकारच्या वतीने अधिकृतरीत्या निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (स्वनिधी) योजनेला फेरीवाल्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. योजना सुरू झाल्यापासून ४१ दिवसांत पाच लाखांपेक्षा अधिक अर्ज सरकारला प्राप्त झाले. तसेच त्याअंतर्गत एक लाखापेक्षा जास्त प्रकरणांत कर्जे मंजूरही करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना १० हजारांपर्यंत खेळते भांडवल मिळू शकते. त्याची परतफेड मासिक हप्त्याने एक वर्षात करायची आहे.या छोट्या व्यावसायिकांना औपचारिक शहरी अर्थव्यवस्थेचा भाग बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जात आहे. त्याद्वारे त्यांचा क्रेडिट प्रोफाईल तयार होईल. त्यातून ते आपोआपच शहरी अर्थव्यवस्थेचा भाग बनतील. गेल्या आठवड्यात मंत्रालयाने ‘लेटर आॅफ रेकमंडेशन मोड्यूल’ जारी केले. त्यानुसार ज्यांच्याकडे ओळखपत्रे अथवा फेरीवाला प्रमाणपत्र नसेल त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.छोटे व्यावसायिक आहेत लक्ष्यपीएम स्वनिधी योजनेनुसार बँकांना छोट्या व्यावसायिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी), सूक्ष्म-वित्त संस्था(एमएफआय), अनुसूचित व्यावसायिक बँका, सार्वजनिक व खासगी बँका, विभागीय ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि एसएचजी बँका यांच्या मार्फत हे अर्थसाह्य फेरीवाल्यांना केले जाणार आहे.
CoronaVirus News: फेरीवाल्यांना मिळणार दहा हजारांचे अर्थसाह्य; पीएम स्वनिधी लाभासाठी मिळाले पाच लाख अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:59 AM