बेंगळुरू : एकीकडे कोरोना व्हायरसमुळे जग थांबल्यासारखे झालेले असताना प्रसार रोखण्यासाठी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. मात्र, दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचे आज लग्न थाटामाटत पार पडले. या व्हीव्हीआयपी लग्न सोहळ्याला अनेकजणांनी उपस्थिती लावली होती. कर्नाटक सरकार यावर लक्ष ठेवणार आहे. संपूर्ण विवाह सोहळ्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येत आहे.
एचडी कुमारस्वामींचा मुलगा निखिल याचा लग्न सोहळा रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर पार पाडण्यात आला. सरकारकडून २१ कारना येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली आहे. कुमारस्वामींचे म्हणणे आहे की, त्यांनी राज्य सरकारकडून लग्नासाठी परवानगी घेतलेली आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे.
तर कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे की, संपूर्ण विवाह सोहळ्याचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. तर कुमारस्वामी यांच्या दाव्यानुसार निखिलचे लग्न हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसोहळा फार्महाऊसवर करण्यात येत आहे.
निखिल याचे लग्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम कृष्णाप्पा यांच्या मुलीसोबत करण्यात आले आहे. दोघांचा साखरपुडा १० फेब्रुवारीला झाला होता. लॉकडाऊन असले तरीही लग्न पुढे ढकलण्यात आलेले नाही.