जम्मू - देशासमोर गंभीर संकट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये अशी सूचनाही सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी लॉकडाऊनमधील बंदी भेदून गावातील घरी पोहोचण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे फंडे अवलंबत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार जम्मूमधील पुंछमध्ये समोर आला आहे.
पुंछमधील सुरनकोट येथे लॉकडाऊनदरम्यान पोलिसांचा पहारा चुकवून गावी पोहोचण्यासाठी एका व्यक्तीने चक्क स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याचे उघड झाले. सुरनकोट येथे पाहऱ्यावर तैनात असलेल्या पोलिसांना एक अँबुलन्स येताना दिसली. पोलिसांनी या अँबुलन्सची तपासणी केली असता त्यात तिघेजण एक मृतदेह नेत असल्याचे दिसले. कसून तपास केला असता सादर मृत व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मृत झाल्याचे सोंग घेणाऱ्या व्यक्तीनेच हा सगळा बनाव रचल्याचे समोर आले आहे. तसेच या व्यक्तींकडून एक मृत्यू प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांवर भादंवि कलम 188, 269, 420 आणि 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सदर अँबुलन्सच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर चार जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.