ओडिशा - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. तसेच, स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचंही यात योगदान आहे. आता, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ऑन ड्युटी २४ तास सेवा देत या क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत एखाद्या सैनिकाप्रमाणे लढत आहेत. त्यामुळे या सर्व लढवय्या कर्मचाऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानुसार देशवासियांनी २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या घराबाहेर येऊन, खिडकीत उभे राहुन आपली कृतज्ञता व्यक्त केली. सोशल मीडियावरही या सर्वांच्या कार्याला सलाम करण्यात येत आहे. विविध इमेजेस आणि टिकटॉक व्हिडीओ बनवून यांच्या कार्याच कौतुक होत आहे. आता, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पुढील ४ महिन्यांचा पगार अॅडव्हान्स स्वरुपात देण्यात मंजुरी दिली आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाशी संबंधित सर्वच कर्मचारी आणि कामगारांना पुढील ४ महिन्यांचा पगार आत्ताच मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि धैर्य वाढवणारा हा निर्णय आहे. पटनाईक यांच्या या निर्णयाचे राज्यातील सर्वच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे
दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लॉक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉक डाऊन म्हणजेच एकप्रकारची संचारबंदी लागू केली आहे. देशातील सर्वच राज्यांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे