चित्रदुर्ग - जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, काही प्रमाणात मिळत असलेल्या सवलतींचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये एका धार्मिक रथयात्रेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्यात आल्याची तसेच या रथयात्रेत राज्याचे आरोग्य मंत्रीही सहभागी झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. कोरोनाविषयक जनजागृती आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करवण्याविषयी प्रवृत्त करण्याची जबाबदारी आरोग्य खात्यावर आहे. मात्र कर्नाटकमध्ये आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांच्या उपस्थितीतच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. श्रीरामुलू हे एका रथयात्रेल सहभागी झाले होते. या रथयात्रेसाठी शेडको लोक उपस्थित होते. तसेच तिथे कुणीही मास्क परिधान केला नव्हता. त्याबरोबरच सोशल डिस्टंसिंगचेही पालन केले नव्हते.
या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात कर्नाटकचे मंत्री श्रीरामुलू दिसत आहेत. तसेच लोकांकडून त्यांचा जयजयकार करण्यात येत होता. तसेच काही लोक जेसीबी मशीनवर उभे राहिलेले दिसत आहेत. या रथयात्रेत श्रीरामुलू यांच्यासोबतच भाजपाचेही काही नेते सहभागी झाले होते.
दरम्यान, कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होता आहेत. आतापर्यंत कर्नाटकमध्ये ३ हजार ४०८ रुग्ण सापडले आहेत.