नवी दिल्ली - देशातील कोरोनाची दुसरी लाट आता जवळपास ओसरली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ६० हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील अनेक भागात अनलॉकची प्रक्रियाही सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बस रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रवासाच्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. (Health Ministrys, Joint Secretary, Lav Agarwal Says Avoid travel as much as you can )
कोरोनाकाळात बस, रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा कमीत कमी वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाविरोधात लढण्यासाठीचे लसीकरण हे अतिरिक्त साधन आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, तसेच शक्य असेल तेवढा प्रवास करणे टाळा. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या सल्ल्यामुळे पुढचा अजून काही काळा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यावर निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग बऱ्यापैकी कमी झाला असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे 60,471 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2726 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,95,70,881 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,77,031 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (15 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.