जगभरातील अनेक देशांवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. असे असताना आता जगभरात ११.६ कोटी मुले जन्माला येणार असा अंदाज युनिसेफच्या एका अहवालातून समोर आला आहे. त्याचबरोबर, या वर्षाच्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचा विचार केल्यास भारतात २.४१ कोटी मुले जन्माला येतील, असेही या अहवालात म्हटले आहे.
जगभरातील विकसनशील आणि विकसित देशांमध्ये पुढच्या काही महिन्यांत 5 कोटी महिला गर्भवती राहतील, त्यामुळे पुढच्या वर्षी लोकसंख्येत मोठी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा तुटवडा असल्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात येते आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांतही हा धोका आहे. अमेरिकेत मार्च ते डिसेंबरपर्यंत ३३ लाख मुले जन्माला येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेचा अभाव असल्यामुळे योग्य उपचार देण्यात यंत्रणा कमी पडत आहे. अशात गर्भवती माता आणि अर्भके यांना पुरेशी आरोग्यसेवा उपलब्ध न होण्याचा धोकाही युनिसेफने आपल्या अहवालात वर्तविला आहे.