नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) रुग्णांची संख्या संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त असण्याचे कारण काय? प्रत्येक राज्य करत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत सर्वात जास्त रुग्ण टक्केवारीत महाराष्ट्र राज्य काही पहिल्या क्रमांकावर नाही तर ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगाल व अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली राज्य आहे. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार कोविड-१९ च्या चाचण्यांच्या तुलनेत सर्वात जास्त रुग्ण संख्या दिल्लीत ८ टक्के, त्यानंतर पश्चिम बंगाल ६.८ टक्के. जम्मू आणि काश्मीर मध्ये ५.५ टक्के रुग्ण चाचण्यांच्या तुलनेत उघडकीस आले. त्यानंतर महाराष्ट्र ५.४ टक्के.आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिओमोलॉजीकडील (एनआयई) माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त ६२ हजार चाचण्या झाल्या व त्यातून कोविड-१९ चे ५.४ टक्के रुग्ण समोर आले. देशभर राज्यांत होत असलेल्या चाचण्यांवर एनआयईचे लक्ष असते.आयसीएमआरने (इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) स्पष्ट केले की, ‘‘रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्शन-पॉलिमिरेझ चेन रिअॅक्शन (आरपी-पीसीआर) ही कोविड-१९ साठी खूप कार्यक्षम चाचणी असून रॅपिड अँटीबॉडी चाचणी ही तिची जागा घेऊ शकत नाही.’’ आयसीएमआरने म्हटले आहे की, ‘‘रॅपिड अँटीबॉडी टेस्टमुळे आम्हाला विशिष्ट भागात रोगाचा फैलाव किती झाला आहे याची कल्पना येते.सूत्रांनी म्हटले की, सरकार आरटी-पीसीआरचे निष्कर्ष काय आहेत हे विचारांत घेईल. या चाचणीचा अहवाल यायला ४८ तास लागतात. वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले की, ‘‘कोविड-१९ चे रुग्ण किती पसरले आहेत याचे निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी येते १० दिवस फारच महत्वाचे आहेत.कुठे किती चाचण्या?दिल्लीत २२ हजार चाचण्या झाल्या असून तेथे ८ टक्के रुग्ण निघाले तर पश्चिम बंगालमध्ये पाच हजार चाचण्या घेण्यात आल्या व तेथे रुग्णांची टक्केवारी ६.८ टक्के आहे. उत्तर प्रदेशात २५ हजार चाचण्या केल्या गेल्या व रुग्ण ३.४ टक्के होते.उत्तर प्रदेश हे देशात सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य. देशात पश्चिम बंगाल हे फक्त पाच हजार चाचण्या झालेले एकमेव राज्य आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पाच लाख एवढ्या संख्येत रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटस राज्यांना दिल्या. या कीटस्द्वारे फक्त ३० मिनिटांत कोविड-१९ च्या चाचणीचा निकाल मिळतो; पण या नव्या कीटस्चा वापर अगदी आता सुरू झाला.
CoronaVirus: जास्त चाचण्यांमुळे महाराष्ट्र रुग्णसंख्येत पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:35 AM