जम्मू – देशात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. अनेकांना घरातच राहावं लागत आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या वर पोहचला आहे तर आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. राजौरी येथील एका कुटुंबाला त्यांच्या घोड्याला इतर प्राण्यांपासून वेगळं ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा घोडा त्याच्या मालकासह काश्मीरपासून राजौरीपर्यंत आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजौरीतील एका कुटुंबाला त्यांच्याकडे असणारा घोडा क्वारंटाईन करायला सांगितला आहे. या घोड्यावर स्वार होऊन त्याचा मालक घाटीपासून मुगल रोडमार्गे येथे पोहचला आहे. हा पर्यायी मार्ग आहे जो घाटीला देशाशी जोडतो. हिवाळ्यात झालेल्या बर्फवारीनंतर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. घोड्याचा मालक राजौरीमध्ये घुसला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं. तो दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातून आला होता.
या मालकाला प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये पाठवलं असून त्याचे नमुने कोविड १९च्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच घोड्याबद्दल मत जाणून घेण्यासाठी प्राण्यांच्या डॉक्टरांकडे मदत मागण्यात आल्याची माहिती तहसिलदार अंजुम बशीर खान यांनी दिली आहे.
जम्मू विभागातील ग्रीन झोनमधील राजौरी हा चार जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे तर शोपियां जिल्हा रेड झोनमध्ये येतो. रेड झोनमधून ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये जाण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. खान म्हणाले की, माणसापासून पाळीव प्राण्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची कोणतीही बातमी नाही, परंतु खबरदारी म्हणून घोड्याला क्वारंटाईन ठेवण्यात आलं आहे. रात्रभर निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्याचं तापमान तपासले गेले आणि मंगळवारी त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, घोडा मालकाच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत घोडा इतर पाळीव प्राण्यांपासून वेगळा ठेवावा अशी सूचना कुटुंबाला देण्यात आली आहे. राजौरीमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण १३ रुग्णांची नोंद झाली आहे. चार रुग्ण बरे झाले असून इतरांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती अंजुम बशीर खान यांनी दिली.