शिवपुरी – संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना यातून वाचण्यासाठी लोकांना घरीच सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोना संक्रमित लोकांची साखळी तोडण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळा असं सांगितले जातं. देशातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत २५० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे आजारी पडलेल्या रुग्णावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आले तर काही ठिकाणी कोरोनाला हरवून पुन्हा घरी परतल्यानंतर लोकांनी स्वागत केल्याचंही दिसून आलं. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात कोरोनाला हरवून घरी परतलेल्या रुग्णाने घराबाहेर मला हे घर विकायचं आहे अशाप्रकारे पोस्टर लावल्याचं दिसलं. दीपक शर्मा असं या इसमाचे नाव आहे.
दीपक कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून पूर्णत: बरा झालेला आहे. मात्र दीपक घरी परतल्यानंतर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याच्यावर आणि कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर दीपकने कोरोनावर मात केली पण समाजाच्या अशा वागण्याने दीपकचं खच्चीकरण होऊ लागलं आहे. त्यामुळे तो कुटुंबासह आपलं घर विकून दुसरीकडे राहण्याची तयारी करत आहे.
इतकचं नव्हे तर दीपकने त्याच्या शेजाऱ्यांच्या दुर्देवी वागण्यामुळे घराबाहेर बोर्डदेखील लावला आहे. हे घर विकायचं आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आलं. तेव्हा दीपकने मीडियाशी बोलताना सांगितले की, मी मानसिक इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यात यशस्वी झालो. आता मी पूर्णत: बरा आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिल्हा प्रशासन, डॉक्टर्स, नर्स यांनी वारंवार फोन करुन मला धीर दिला पण जेव्हा मी पूर्ण बरा होऊन शिवकॉलनी येथील माझ्या घरी आलो त्यावेळी माझ्यासोबत शेजाऱ्यांनी अत्यंत हीन प्रकारची वागणूक केली. त्यांच्या अशाप्रकारे वागण्याने मी दु:खी आहे. आजार कोणालाही होऊ शकतो पण अशी वागणूक करु नये असं त्यांनी सांगितले.
तसेच दीपकच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी येणारा भाजी आणि दूधवाला यांनाही बंदी केली आहे. रात्री दीपकच्या घराचा दरवाजा जोरजोरात आपटून शिवीगाळ केली जाते. त्यांना घर खाली करुन जाण्यासाठी दबाव आणला जात आहे असा आरोप दीपकच्या वडिलांनी केला. या प्रकरणात शेजाऱ्यांनी मीडियाशीही बोलायला नकार दिला.