नवी दिल्ली - एकीकडे सव्वा दोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच दुसरीकडे देशातील विविध कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी देशभरात मिळून कोरोनाचे ९ हजार ३०४ सापडले आहेत. देशात 24 तासांमध्ये कोरोनाचे एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर 260 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सहा हजारांवर पोहोचली आहे.
जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. आतापर्यंत देशभरातील १८० देशांत कोरोनाचा फैलाव झाला असून, साडे तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 63 हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच दररोज हा आकडा वेगाने वाढत आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे ९ हजार ३०४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचला आहे. तर २४ तासांमध्ये तब्बल २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ६ हजार ७५ वर पोहोचला आहे.
मात्र रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ जण कोरोनामधून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट ४७.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीला देशातील काही राज्ये कोरोनामुक्त होती. तसेच काही राज्यात रुग्णांची संख्या मर्यादित होती. मात्र स्थलांतरित मजुरांचे आगमन आणि प्रवासाला दिलेल्या परवानगीनंतर काही राज्यांमधील कोरोनाचे गणित बिघडले आहे.