Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:41 AM2020-04-20T08:41:26+5:302020-04-20T08:46:56+5:30
Coronavirus : देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे.
नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 1334 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 15712 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. याच दरम्यान वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.
कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं म्हणून पत्नीने घरीच त्याच्यावर उपचार केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्येडॉक्टर महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. डॉक्टर महिलेला पतीमध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसली. म्हणून ती त्याला घेऊन रुग्णालयात गेली. मात्र चार रुग्णालयांनी पतीला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर पत्नीने घरीच पतीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आणि योग्य ते उपचार सुरू केले. पतीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याआधीच तो घरीच उपचार करून ठीकही झाला होता. मात्र टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नयापुरामध्ये राहणाऱ्या अमन सय्यद यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्यामध्ये कोरोना लक्षणे दिसल्याने त्यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नीने त्यांना उपचारासाठी रुग्णालय नेलं. मात्र साधा ताप असल्याचं सांगत रुग्णालयाने त्यांना घेण्यास नकार दिला आणि परत पाठवण्यात आलं. त्यानंतर त्या इतर रुग्णालयात गेल्या. तिथेही त्यांना हेच सांगण्यात आलं. त्यामुळे त्या पतीला घेऊन घरी आल्या आणि तिथेच उपचार सुरू केले. पतीला कोरोना झाल्याची शंका डॉक्टर पत्नीला आली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या घरामध्येच आयसोलेशन सेंटर केलं होतं. तिथेच ते बरे झाले.
31 मार्चला एका रुग्णालयात पतीची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत घरी पाठवलं होतं. तोपर्यंत डॉक्टर पत्नीने उपचार सुरू केले होते. सहा दिवसांनी तपासणीचे रिपोर्ट आले त्यात पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत त्यांच्यात कोरोनाची लक्षणं उरली नव्हती. शेवटी 17 एप्रिलला करण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: आजपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल; थोडी सूट, काही निर्बंध
CoronaVirus: ग्रीन, ऑरेंज झोनमधील नागरिकांना आजपासून दिलासा; जाणून घ्या काय बंद, काय सुरू